नवीन प्रभाग रचना दिवाळीपुर्वी संपणार!

80

– प्रगणक गट ‘जैसे थे’ ठेवण्यावर महापालिकेचा कटाक्ष

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) : राज्य निवडणूक आयोगाने तीनसदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिका नवीन प्रभाग रचना तयार करण्याची कवायत करत आहे. सर्वसाधारणपणे प्रभाग रचनेचा आराखडा तयार झाल्यानंतर तो पंधरा दिवसांच्या आत राज्य निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो. परंतु यंदा निवडणूक आयोगाकडून तारीख निश्चित नसल्याने संथ गतीने प्रभाग रचना तयार केली जात असून आता दिवाळीनंतरच आराखडा सादर होण्याची शक्यता आहे. प्रभागांची मोडतोड होत असल्यान महापालिका निवडणूक विभागात सतर्कता बाळगली जात आहे. २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग तयार करताना आलेले प्रगणक गट (ईबी) जशास तसे ठेवण्यावर महापालिका अधिकाऱ्यांचा कटाक्ष आहे. विशिष्ट राजकीय मंडळींना डोळ्यासमोर ठेवून प्रभाग तयार केले जाणार नाहीत, असेही सांगण्यात आले.

राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला तीन सदस्यांचा प्रभाग तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रारूप आराखडा तयार करून ठेवणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी, कर्मचारी अंतिम आराखडा तयार करतील. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन महापालिकेकडून केले जात आहे.नव्याने प्रभाग रचना करताना तीन वॉर्डांची जुळवाजुळव करताना प्रगणक गट विचारात घ्यावे लागत आहेत. प्रगणक गट फोडता येणार नाहीत किंवा जवळचे वॉर्ड सोडून इतर वॉर्डालाही गट जोडता येणार नाहीत. वॉर्डाच्या सीमारेषा तयार करताना प्रगणक गटाचा विचार करूनच नकाशाचे काम करावे लागत आहे. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेले वॉर्ड एकत्र करून त्यांचे प्रभाग तयार केले जाणार आहेत. तीन वॉर्डांचा एक प्रभाग बनवला जाणार असल्यामुळे वॉर्डांच्या सीमा मोठ्या प्रमाणात बदलल्या जाण्याची शक्यता आहे. प्रगणक गटांची अदलाबदल करायची झाल्यास वॉर्ड आणि प्रभाग सोडून करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या जवळपास सारखी राहण्याची शक्यता आहे.

महापालिकेची निवडणूक २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारावर होणार आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या वेळी १७ लाख २७ हजार ६९२ इतकी लोकसंख्या होती. तोच निकष यंदा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या ३२ प्रभाग चार सदस्यीय असल्याने १२८ नगरसेवक आहेत, मात्र आता ४३ प्रभाग असणार आहेत. आता चार सदस्यांऐवजी तीन सदस्यांची निवड करण्यात येईल. अर्थात ही प्रारूप प्रभाग रचना असून, ती राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर हरकती आणि सूचना मागवण्यात येतील. जनगणना करताना प्रत्येक वॉर्डात नागरिकांचा एक ‘प्रगणक गट’ तयार करण्यात आला. प्रत्येक प्रगणक गटाला एक विशिष्ट क्रमांक देण्यात येतो. त्यानुसार त्या प्रगणक गटाची ओळख असते. वॉर्डातील लोकसंख्या ठरविताना हे प्रगणक गट उपयोगात आणले जातात.

२६ ऑगस्टपासून प्रभाग रचना तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रभाग रचना तयार करताना सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. ३२०१ प्रगणक गटांमधून साधारण प्रगणक गट एकत्र करून प्रभाग अस्तित्वात येईल. तीनसदस्यीय प्रभाग रचना तयार करताना आता ४३ प्रभाग तयार केले जाणार आहेत. त्यात तीन सदस्यांचे ४२ तर दोन सदस्यांचा एक प्रभाग तयार होईल. निवडणूक आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसात प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाते. परंतु निवडणूक आयोगाच्या सुचनांमध्ये तारखेचा कुठलाच उल्लेख नसल्याने तूर्त संथ गतीने प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रारुप आराखडा अंतिम होत असताना दिवाळीच्या सुट्टया आल्याने त्यानंतरच राज्य निवडणूक आयोगाला प्रारूप आराखडा सादर केला जाईल. त्यानंतर प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्यावर हरकती, सूचना मागवून अंतिम केला जाईल.

प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार होत असताना प्रभागांच्या हद्दी बदलण्याची शक्यता असल्याने विद्यमान नगरसेवकांकडून त्यांच्याच सध्याच्या प्रभागामध्ये प्रस्तावित केलेली कामे अन्य म्हणजे सोईच्या ठिकाणी वळविण्याचे प्रकार होत आहेत. ज्या भागाशी निवडणुकीत संबंध राहणार नाही, त्या भागातील कामे पळविली जात आहेत. सन २०१७ च्या निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग होता. ४० ते ५० हजार लोकसंख्येच्या प्रभागाची व्याप्ती मोठी असल्याने मोठी आणि नजरेस पडतील, अशी कामे करण्याकडे नगरसेवकांचा कल होता. आता ३० ते ३५ हजार लोकसंख्येचा प्रभाग होणार असल्याने भौगोलिक क्षेत्रदेखील कमी होणार आहे. त्यामुळे ज्या भागातून पुढील निवडणूक लढवायची आहे, त्या प्रभागात कामे करण्याकडे नगरसेवकांचा कल आहे. त्यासाठी प्रस्तावित प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधी अन्य कामांकडे वळविण्याचे प्रस्ताव सादर होत आहेत. प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आलेला निधी अन्यत्र वळविण्यासाठी नगरसेवकांची धावाधाव सुरू आहे. महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात कामे प्रस्तावित करून त्यानुसार निधीची तरतूद केली जाते. अंदाजपत्रकात त्याप्रमाणे नोंददेखील असते. स्थायी समिती, महापालिका सर्वासाधारण सभेच्या मान्यतेने अंदाजपत्रकात कामांची तरतूद केली जाते. अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे ठरावात रूपांतर होते. ठरावाला कायदेशीर स्वरूप प्राप्त होत असल्याने ज्या कामासाठी निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याच कामासाठी निधी खर्च करावा लागत असल्याने नगरसेवकांकडून अन्य कामांकडे निधी वळविण्याचे प्रस्ताव सादर होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

१) लोकसंख्या (२०११) : १७ लाख २७ हजार ६९२
२) अनुसूचित जातीची लोकसंख्या : २ लाख ७३ हजार ८१० (१५.८४ टक्के)
३) अनुसूचित जमातीची लोकसंख्या : ३६ हजार ५३५ (२.११ टक्के)
४) दोन सदस्यीय प्रभाग संख्या : ६४
५) नगरसेवक संख्या : १२८
६) अनुसूचित जातींसाठी राखीव जागा : २०
७) अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा : ०३ ८) महापालिका मतदारसंख्या (१ सप्टेंबर २१) : १३ लाख ३८    हजार २७
९) चिंचवड विधानसभा मतदारसंख्या : ५ लाख ५२ हजार ८६८
१०) पिंपरी विधानसभा मतदारसंख्या : ३ लाख ५७ हजार ८१२
११) भोसरी विधानसभा मतदारसंख्या : ४ लाख ५१ हजार ३५७

WhatsAppShare