“नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केल्यानेच ते एवढा थयथयाट करतायत”: यास्मिन वानखेडे यांचा हल्लाबोल

81

– “आम्हाला धमक्या आणि जीवे मारण्याचे, कापण्याचे कॉल येत आहेत”

मुंबई, दि.२६ (पीसीबी) : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. मलिक हे ड्रग्ज लॉबीचे प्रवक्ते असून त्यांच्या जावयाला अटक केल्यानेच ते थयथयाट करत असल्याचा दावा यास्मिन वानखेडे यांनी केला आहे. यास्मिन वानखेडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. नवाब मलिक हे ड्रग्ज लॉबीच्या सांगण्यावरूनच आरोप करत आहेत. मलिक यांच्यामागे ड्रग्ज लॉबी असणार. त्यांना पैसे देऊन आरोप करायला लावत असतील. ड्रग्ज लॉबींनी त्यांना प्रवक्ते म्हणून नेमले असावे. त्यांच्या जवायाला अटक केली होती. त्यामुळेच ते आरोप करत असावेत, असा दावा यास्मिन वानखेडे यांनी केला आहे.

“मलिक आदरणीय मंत्री आहेत. पण त्यांना हे शोभत नाही. ते चुकीची माहिती देत आहेत. तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा. मीडियाला बोलवून केवळ प्रसिद्धी घेऊ नका. तुमचा वेळही वाया घालवू नका, असं त्यांनी सांगितलं. समीर वानखेडे यांचं बर्थ सर्टिफिकेट नेटवर मिळत नसल्याचं मलिक यांनी सांगितलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनाच बर्थ सर्टिफिकेट मिळत नाही. ते बर्थ सर्टिफिकेट का शोधत आहेत? त्यांची रिसर्च टीम आहे ना? मुंबईतील पोस्ट केलेला फोटो दुबईतील दाखवतात. मग त्यांनी शोधावं सर्टिफिकेट, असं सांगतानाच आमचं बर्थ सर्टिफिकेट शोधण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही कोण आहात? एखाद्या नोकरशहाचं सर्टिफिकेट काढण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुमचं सर्टिफिकेट कुणी काढलं आहे का?”, असा सवालही त्यांनी केला.

समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्यापाठोपाठ यास्मिन यांनीही त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा केला आहे. रोज धमक्या येत आहेत. त्यामुळे घरात भीतीचं वातावरण आहे. आम्ही काम करणाऱ्या महिला आहोत. आम्हाला धमक्या आणि जीवे मारण्याचे फोन येत आहे. कापण्याचे कॉल येत आहेत. मला वाटतं आता आम्हीही रोज खोटे पुरावे देऊन पीसी घ्यायला हवी, असा टोलाही त्यांनी लगावला. धमक्या येत असल्याने पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. समीर वानखेडे या सर्व प्रकरणातून बाहेर पडतील. सत्यमेव जयते होईलच. ते बाहेर पडतील. नेहमीच सत्याचा विजय होतो. तो होईलच, असंही त्या म्हणाल्या.

WhatsAppShare