नवज्योतसिंह सिद्धूने मुंबईत पाऊल ठेवले, तर त्याचे हातपाय छाटू ; भाजप नेत्याचा इशारा  

769

मुंबई,  दि. २१ (पीसीबी) – माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धूने पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या घेतलेल्या गळाभेटीचा निषेध करण्यासाठी  भाजपच्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात मोर्चा काढला होता. यावेळी सिद्धू यांनी मुंबईत पाऊल ठेवले तर त्यांचे हातपाय छाटू, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे वरिष्ठ नेते आणि दर्गा समिती अजमेरचे सदस्य मोहम्मद फारुख आजम यांनी व्यक्त केली.

यावेळी आजम म्हणाले की, ‘सिद्धू यांना अटक करण्यात यावी. तसेच त्यांच्यावर  देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला चालवला जात नाही, तोपर्यंत आम्ही ठिकठिकाणी धरणे आंदोलन करू. सिद्धूने मुंबईत पाऊल ठेवले, तर त्याचे हातपाय छाटू, असा इशाराही त्यांनी दिला.

आझाद मैदानात आंदोलन केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सिद्धूचे पोस्टर जाळून  निषेध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले. सिद्धूविरोधात त्यांनी घोषणाही दिल्या.  दरम्यान, बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये सोमवारी (दि.२०) एका न्यायालयात सिद्धूविरोधात राजद्रोहासह अनेक आरोप असलेला खटला दाखल करण्यात आला आहे.