नवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता

335

इस्लामाबाद, दि. १८ (पीसीबी) – इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानात आज (शनिवार) गेलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर टीका सुरू असताना त्यांनी तिथे केलेल्या एका कृतीमुळे आणखी नवे वादंग माजण्याची शक्यता आहे. सिद्धू यांनी  पाकचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. भारताविरोधात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखांना सिद्धूंनी दिलेल्या आलिंगनामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते राशिद अल्वी यांनी सिद्धूंच्या या कृतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सिद्धूंनी आमचा सल्ला घेतला असता तर आम्ही त्यांना पाकमध्ये जाऊच दिले नसते. ते मित्रत्वाच्या नात्याने तिथे गेले आहेत. पण, मैत्री ही देशापेक्षा मोठी नाही. पाकिस्तानच्या गोळीबारात सीमेवर भारतीय जवान शहीद होत असताना सिद्धूंनी पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेणे, अत्यंत चुकीचे आहे, असे अल्वी म्हणाले. केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळेच सिद्धू पाकिस्तानात गेले आहेत. सरकारने त्यांना परवानगी नाकारायला हवी होती, असेही ते म्हणाले.