नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा माओवाद्यांचा कट; पुणे पोलिसांचा दावा

407

पुणे, दि. २८ (पीसीबी) – पाच राज्यांमध्ये माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अनेक ठिकाणी पुणे पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी पी वरावर राव, गौतम नवलखा, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, अनू भारद्वाज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा माओवाद्यांचा कट होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा माओवाद्यांचा कट होता, असा पोलिसांनी दावा केला आहे. या सर्व कटाचा उलगडा अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली.  त्यांच्याशी संबंधित पुण्यामधून वरावर रावना अटक केल्यानंतर त्यांच्या हैदराबाद येथील घरावरही छापा मारण्यात आला. तसेच अरूण परेराना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. परेरा यांनी आपण निष्पाप असल्याचा दावा केला आहे. आपण काही खटल्यांमध्ये सरकारविरोधी काम केल्याने अटक केल्याचा त्यांचा दावा आहे. आपली अटक म्हणजे मानवाधिकारांचं उल्लंघन असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.