नरेंद्र मोदींची तुलना हिटलरशी करणे अयोग्य – मिलिंद देवरा

93

मुंबई, दि. २ (पीसीबी) – आणीबाणीच्या चुकीच्या निर्णयाबद्दल माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेसने माफी मागितली होती, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिटलरसोबत तुलना करणे चुकीचे आहे, असे मत काँग्रेस नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले आहे.

देवरा यांनी एका व्हिडिओतून आणीबाणी, महिला सुरक्षा याबाबत मत व्यक्त केले आहे. राजकीय पक्षांनी नेत्यांची तुलना हिटलरशी करणे थांबवले पाहिजे. भाजपने इंदिरा गांधींची तर काँग्रेसने नरेंद्र मोदींची तुलना हिटलरशी करणे योग्य नाही. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात हिटलरसारखा नेता होणे अशक्य आहे. एखाद्याचा एकाधिकारशाही आणण्याचा प्रयत्न  हाणून पाडला जाईल, असे देवरा यांनी म्हटले.

इंदिरा गांधी यांच्या काळापेक्षा देशात सध्या जास्त सेन्सॉरशिप आहे. सरकार आणि पंतप्रधानांनीच यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. मोठ्या कंपन्या, मनोरंजन क्षेत्र, खासगी क्षेत्रातील मोठे अधिकारी, सामाजिक संस्था यांच्याशी त्यांनी चर्चा करुन कुठे कुठे सेन्सॉरशिप आहे, याचा आढावा घेऊन यावर तोडगा काढला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.