नराधमांपासून अब्रू वाचवण्यासाठी अल्पवयीन मुलीने घेतली विहिरीत उडी

248

राजस्थान, दि. ७ (पीसीबी) – बलात्कार करण्यास आलेल्या दोघा नराधमांपासून अब्रू वाचवण्यासाठी एका अल्पवयीन तरुणीने विहिरीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार (दि.६) राजस्थानमधील झुनझुनू येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राजस्थानच्या झुनझुनू येथे दोन नराधमांनी बलात्काराचा प्रयत्न केल्याने अल्पवयीन तरुणीने अब्रु वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. विहिरीत उडी मारल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, तरुणीने विहिरीत उडी मारल्याचे पाहताच त्या नराधमांनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर तिच्या आवाजामुळे काही नागरिक तेथे आले आणि तरुणीला रुग्णालयात दाखल करुन पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.