नडला की तोडला म्हणत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेच्या घरावर तलवारीने वार

136

नाशिक, दि. १३ (पीसीबी) – नडला की तोडला, असे म्हणत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेच्या बंगल्याच्या गेटवर तलवारीने वार केले. तसेच रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. 12) रात्री आकाराच्या सुमारास ओम कॉलनी, चिंचवड येथे घडली.

शिवानंद हेळवे, बसवराज हेळवे, आदित्य आंबुसकर, सोमनाथ माने, शाम कोळी व त्यांचे इतर साथीदार (नाव व पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अशा सूर्यवंशी यांचे पती ज्ञानेश्वर रामभाऊ सूर्यवंशी (वय 56, रा. ओम कॉलनी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आरोपींनी फिर्यादी सूर्यवंशी यांच्या घरासमोर येऊन राजकीय वैमनस्यातून फिर्यादी व त्यांच्या मुलाचे नाव घेऊन मोठमोठ्याने शिवीगाळ केली. तसेच, घराच्या गेटवर कोयत्याने व तलवारीने वार केले. तलवारीचा नंगा नाच करून परिसरात दहशत पसरवली.

बाहेरून आरडाओरडा आणि शिवीगाळ केल्याचा आवाज आल्याने सूर्यवंशी घराबाहेर आले. आरोपींनी ‘नडला की तोडला’ असे म्हणत रस्त्यावर पार्क केलेल्या दहा वाहनांची तोडफोड केली. तसेच, रोहित अनिल पवार यांच्या कारमधून काही रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

राजकीय वैमनस्यातून तसेच परिसरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने आरोपींनी ही तोडफोड केल्याचा आरोप फिर्यादी सूर्यवंशी यांनी केला आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.