नगरसेविका आशा शेंडगे-धायगुडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – आ.महेश लांडगे

277

पिंपरी,दि.१३(पीसीबी) – स्मार्ट सिटीच्या कामाला विरोध करून त्याविरोधात गेल्या गुरुवारी (ता.९) पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे-धायगुडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त दालनाबाहेर गोंधळ घातला. यावेळी आयुक्तांच्या नामफलकाला काळे फासण्यात आले. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांनी धायगुडेंसह त्यांच्या नऊ कार्यकर्त्यांना अटक केली. सध्या ते सर्वजण येरवडा कारागृहात आहेत. ही घटना निंदनीय असल्याचे सांगत भाजपने पक्षनेते नामदेव ढाके यांनी त्याचा लगेचच त्याच दिवशी निषेध केला होता.

मात्र, गेल्या महिन्यात एक लाख १८ हजाराच्या लाचखोरीत पकडले गेलेले स्थायी समिती अध्यक्षांच्या समर्थनार्थ संपूर्ण भाजप लगेचच उभा राहिला होता. हे एक षडयंत्र असल्याचे त्यांनी सांगत स्थायी अध्यक्षांना त्यात गोवण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांच्याच नगरसेविका असलेल्या धायगुडेंच्या बाबतीत चार दिवसानंतरही भाजप असा मैदानात उतरला नव्हता. ही बाब शहरवासियांना खटकली होती. त्यानंतर भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी धायगुडे यांच्याबरोबर पक्ष आहे, असे स्पष्ट केले. त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांना या प्रकरणातून बाहेरही काढू, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वीही प्रशासन विरुद्ध नगरसेवक वाद झाले. पण, ते गुन्हा दाखल होईल, या टोकापर्यंत कधी गेले नव्हते, असे सांगत लांडगे यांनी यामागे तोंडावर आलेली महापालिका निवडणूक असल्याचेच अप्रत्यक्षपणे सूचित केले. 

WhatsAppShare