नगरसेवक दाखवा १००० रुपये मिळवा

0
693

– पिंपरी चिंचवड शिवसेना उपशहरप्रमुख युवराज कोकाटे यांचा उपक्रम

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकिच्या तोंडावर सत्ताधारी भाजपाच्या विरोधत शिवसेना आता खूप आक्रमक झाली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील अजंठानगर प्रभाग क्रमांक ११ मध्ये नगरसेवक दाखवा १००० रुपये मिळवा, असा एक हटके उपक्रम शिवेसनेचे उपशहरप्रमुख युवराज कोकाटे यांनी जाहिर केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रभागात भाजपाचे जेष्ठ नगरसेवक आणि माजी सत्ताधारी नेते एकनाथ पवार यांच्यासह संजय नेवाळे, योगिता नागरगोजे, अश्विनी बोबडे हे चारही भाजपाचेच नगरसेवक आहेत. पाच वर्षांत हे नगरसेवक फिरकलेच नाहीत असा कोकाटे यांचा आक्षेप आहे.

शिवसेनेच्या वतीने कोकाटे यांनी अजंठानगर मध्ये गेंडा चौक, गगनगिरी हौसिंग सोसायटी, भोपळ्या चौकात हुंदाई शोरुम समोर, माता रमाबाई आंबेडकर शाळे समोर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी प्रवेशद्वारा जवळ भले मोठे होर्डींग्ज लावले आहेत. परिसरातील नागरिकांसाठी हे होर्डिंग्ज चर्चेचा विषय ठरले आहेत. कोकाटे यांनी या विषयावर संपर्कासाठी शिवसेनेचे शाखाप्रमुख शहादेव औसरमल, उपविभाग प्रमुख जयराम लांडगे, उपशाखा प्रमुख कुमार कांबळे आणि बबलु ओव्हाळ यांचे मोबाईल क्रमांक दिले आहेत.

होर्डींग्जवर शिवेसनेचे संपर्कनेते सचिन आहेर, रविंद्र मिर्लेकर, जेष्ठ नेत व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भूम परांडा तालुक्याचे आमदार तानाजी सावंत यांचे फोटो आहेत.
युवराज कोकाटे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत हे नगरसेवक अजंठानगरला फिरकले नाहीत म्हणून लोकभावना विचारात घेऊन असे फलक लावायची वेळ आली आहे. लाख रुपये खर्च झाले तरी चालतील, पण या विषयावर बोलत राहणार.