नगरसेवकांना ‘पीएमआरडीए’ सदस्यत्वाचे गाजर

69

– नाराज नगरसेवकांचे संभाव्य पक्षांतर टाळण्यासाठी भाजपाची खेळी

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) निवडणुकीत विजयी होणाऱ्या सदस्यांना पुढे सहा वर्षे मुदत असल्याचे गाजर भाजपाने दाखवले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होते आहे. अवघ्या चार महिन्यांत आताच्या नगरसेवकांची मुदत संपत असल्याने त्यांना पीएमआरडीए सदस्यत्वासाठी सहा वर्षाचा कालावधी कसा मिळणार याबाबत उमेदवारी जाहिर करण्यात आलेले नगरसेवकसुध्दा संभ्रमात आहेत.

पीएमआरडीए सदस्यत्वासाठीची निवडणूक होत असून ८ नोव्हेंबर रोजी मतदान आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतून नगरसेवकांमधून २२ सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचे मिळून ७ तर नगरपालिकांतून १ सदस्य नगरसेवकच निवडणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपाच्या उमेदवारांनी मंगळवारी (दि.१२) आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या उमेदवरांमध्ये सत्ताधारी नेते नामदेव ढाके, संदीप कस्पटे, अभिषेक बारणे, जयश्री गावडे, वसंत बोराटे, चंद्रकांत नखाते, निर्मला गायकवाड या नगरसेवकांचा समावेश आहे. या सर्वांना पीएमआरडीए साठी सहा वर्षे तुम्हीच सदस्य असल्याचे भाजपाने सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने माजी महापौर डॉ.वैशाली घोडेकर यांच्यासह जेष्ठ नगरसेवक मोरेश्व भोंडवे, अजित गव्हाणे आणि डब्बू आसवाणी यांनी उमेदवारी दिली असून त्यांनी आज आपले  अर्ज दाखल केले.

नगरसवेकपदाची मुदत संपली आणि पुन्हा निवडूण आलात की तुम्हीच पुन्हा त्या पदावर कायम असणार, असेही आश्वासन देण्यात आले आहे. उमेदवारी देण्यात आलेले सर्व जेष्ठ सदस्य असून गेल्या पाच वर्षांत सत्ताधीर नेते नामदेव ढाके वगळता एकालाही महापालिकेत महत्वाचे पद मिळालेले नाही. काही सदस्य राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे चर्चा असल्याने भाजपाच्या गोटात प्रचंड अस्वस्थता आहे. त्यांवर तोडगा म्हणून काही सदस्यांना पीएमआरडीए ची उनमेदवारी देण्यात आली आहे, असे समजले.

 वास्तवात पीएमआरडीए सदस्य झाले तरी चार महिन्यांच्या पुढे कार्यकाल मिळू शकत नाही, कारण नगरसेवकपदाचीच मुदत चार महिन्यांत संपते आहे. तेच नगरसवेक पुन्हा निवडूण आले तरी त्यांना पुन्हा पीएमआरडीए सदस्यत्वसाठी दुसरी निवडणूक अपरिहार्य आहे. त्याशिवाय संबंधीत नगरसेवक सार्वत्रिक निवडणुकित पराभीत झाला तरी त्याचे सदस्यत्व जाणार आहे. महत्वाचा भाग म्हणजे पीएमआरडीए ची त्रेमासिक बैठकसुध्दा होत नाही, त्यामुळे नव्याने सदस्य होणाऱ्यांना एक बैठकसुध्दा मिळणे कठिण आहे. महापालिका निवडणुका ठरलेल्या वेळेत झाल्याच तर ४५ दिवसांची आचारसंहिता डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या सुरवातीला लागणार आहे. याचाच अर्थ अवघे दोन महिन्या पुरते कागदोपत्री पीएमआरडीए सदस्य होण्याची संधी आहे. इतक्या अल्प कालावधीसाठी पीएमआरडीए सदस्यत्व असताना सहा वर्षांची मुदत असल्याचे गाजर दाखवून भाजपाने आपल्या नाराज नगरसेवकांना शांत केले आहे.

  

WhatsAppShare