नगरपंचायतीचे निकाल महाआघाडीच्या पथ्यावर

79

– भाजपाला रोखण्यासाठी महापालिका, जिल्हा परिषदेलाही तोच फॉर्म्युला
– नेते व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुनावला

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडलेल्या राज्यातील १०६ नगरपंचायतींच्या निकालात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या तरीसुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या एकत्रित जागांचे प्रमाण मोठे असल्याने महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. आगामी जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकांनाही याच पद्धतीने एकत्र लढून भाजपाला सत्तेपासून कामयचे दूर ठेवण्याच्या निर्णयाप्रत महाआघाडीचे नेते आले आहेत. आजच्या निकालामुळे राज्यातील महाआघाडी सरकार कितीही प्रयत्न केले तरी पडत नसल्याचे स्पष्ट झाले असून त्यामुळे आता नेते आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुनावला आहे.

महाराष्ट्रातील नगरपंचायतीच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. १०६ पैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले. त्यात सर्वाधिक ४१६ जागा भाजपाला मिळाल्याने तो पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला, तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस ३६९, काँग्रेस २९७, शिवसेना ३०१ आणि २६२ अपक्षांना जागा मिळाल्या. सर्वाधिक २५ नगरपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या असून त्याखालोखाल भाजपाला २४, काँग्रेसला १८ आणि शिवसेनेला अवघ्या १४ नगरपंचायतींवर सत्ता प्रस्थापित करता आली आहे. महाविकास आघाडीच्या एकत्रित जागा ९७६ आणि ५७ नगरपंचायती हातात आल्या आहेत, तर भाजपाला ४१६ जागा आणि २४ नगरपंचायतींवर सत्ता मिळाली आहे.

महाविकास आघाडीचे राज्य सरकार आज-उद्या कोसळणार, अंतर्गत ममतभेदातून सरकार गडगडणार आणि पुन्हा भाजपाची सत्ता येणार या भाजपा नेत्यांच्या सर्व वल्गना खोट्या ठरल्या. सरकार कोसळले तर मध्यावधी निवडणूक लागेल ही भाजपाची अटकळसुध्दा खोटी ठरत असल्याचे दिसले. उलटपक्षी काँग्रेस स्वतंत्र रिंगणात असताना राष्ट्रवादी आणि शिवेसना एकत्र लढल्याने मोठा फायदा झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीची ताकद चांगलीच वाढली आहे. भाजपाला सत्तेपासून बाजुला ठेवण्यासाठी राज्यात तीन पक्ष एकत्र आले आणि नंतरच्या काळात काही किरकळ तडजोडी करत विविध निवडणुकांमध्ये एकी दाखविल्याने फायदाच होत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्षा आले. आगामी काळात जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका मार्च- एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यावेळीसुध्दा आपापसात न लढता भाजपा विरोधात एकत्र लढण्याची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे. त्यामुळे ज्या महापालिकांतून भाजपाची सत्ता आहे तिथे सुरुंग लागण्याची दाट शक्यता आहे. नगरपंचायत झाकी है जिल्हा परिषद बाकी है, अशा काही घोषणा पंचायत निकालनंतर विजयी कार्यकर्त्यांनी दिल्या. राष्ट्रवादी आणि शिवसेना आता गोव्यात होणाऱ्या निवडणुकिसाठी एकत्र आले आहेत. मुंबई व ठाणे महापालिकेत शिवसेनेला झुकते माप, पुणे आणि पिंपरी चिंचवड ला राष्ट्रवादीकडे सर्व निर्णय सोपविण्याची सामंजस्याची भूमिका भाजपाच्या मुळावर येऊ शकते. ओबीसी आरक्षणाचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो हा अंदाज फोल ठरला आहे.