नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप खरे असतील, तर मला अटक करा – दिग्विजय सिंह

99

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – माझ्यावर देशद्रोही असल्याचे आरोप झाले आहेत. आता नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. जर माझ्यावरील आरोप खरे असतील, तर मला अटक करा, असे आव्हान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपला दिले आहे.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिग्विजय सिंह यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर दिग्विजय सिंह यांनी पात्रा यांना जर माझ्यावरील आरोप खरे असतील तर मला अटक करा, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

संबित पात्रा यांनी म्हटले होते की, भीमा कोरेगाव प्रकरणी सुरुवातीला पोलिसांकडून ज्या नक्षलसमर्थकांच्या घरांवर छापेमारी करीत अटक करण्यात आली. या छाप्यात आढळून आलेल्या पत्रांमध्ये एका पत्रात दिग्विजय सिंह यांचा फोन क्रमांक मिळाला होता. तसेच हा त्यांचा नंबर असल्याचा त्यांनी इन्कारही केला नव्हता.

या पत्रात काँग्रेसच्या नेत्यांकडून आंदोलनासाठी नक्षलवाद्यांना निधी देण्याबाबतचा उल्लेख केला आहे. सुरेंद्र गडलिंग आणि प्रकाश नामक दोन कॉम्रेड्सनी २५ सप्टेंबर २०१७ रोजी लिहीलेल्या पत्रात दिग्विजय सिंह यांचा फोन क्रमांक तपास पथकांना मिळाल्याचा दावा संबित पात्रा यांनी केला आहे.