नक्षलवाद्यांशी संबंधातून अटक केलेले कार्यकर्ते डाव्या विचारांचे असले तरी नक्षलवादी वाटत नाही- शरद पवार

273

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – ‘नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांपैकी काहींना आपण ओळखतो. ते डाव्या विचारांचे असले तरी नक्षलवादी असतील आणि कोणाची हत्या करतील, असे आपल्याला वाटत नाही. त्यांना झालेली अटक दुर्दैवी आहे’, असे नमूद करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी पुणे पोलिसांच्या कारवाईपुढे प्रश्नचिन्ह लावले.

‘सनातन संस्थेशी संबंध असलेल्या संशयितांवरून लक्ष उडविण्यासाठी त्यांना अटक करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही’, असे पवार म्हणाले. ‘महाराष्ट्रात अटक करण्यात आलेल्या लोकांना व त्यांच्या कुटुंबियांना आपण भेटणार आहोत’, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्याचा चुकीचा सल्ला अंमलात आणल्याने देशाची आर्थिक प्रकृती बिघडली. मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे देश संकटात सापडला. चुकीच्या सल्लागारांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली. सरकारने देशातील युवकांना रोजगाराचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात परिस्थिती विपरित आहे. शेतकऱ्यांविषयी मोदी सरकार असंवेदनशील असून राजकीय निर्णय घेण्यात कच खात असल्याचा आरोप पवार यांनी केला. गेल्या वर्षात १ हजार ९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही संख्या वाढतच असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.