‘नको ती कामे घेऊन येऊ नका. उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाही’

171

बारामती, दि.२५ (पीसीबी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्य असो, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असो किंवा विरोधक, आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त बोलायचं… मग समोरच्याला राग येऊ किंवा लोभ…. याची फिकीर करायची नाही, असा दादांचा स्वभाव.. एव्हाना हा स्वभाव आता बारामतीकरांनाच नव्हे तर महाराष्ट्राला माहिती झालाय. आज बारामतीमधल्या एका कार्यक्रमामध्ये एका प्रसंगावरुन अजितदादांचा पारा चढला. ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, अशा शब्दात त्यांनी काम घेऊन आलेल्या व्यक्तीला सुनावलं.

नेहमीप्रमाणे अजित पवार शनिवारी पुण्याच्या आणि रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात सर्वसामान्य बारामतीकर आपापली कामं घेऊन अजितदादांकडे येत असतात. आज सकाळी बारामतीमधल्या देसाई इस्टेट इथे अजितदादांचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी एक व्यक्ती आपलं काम घेऊन अजितदादांकडे आला. यावेळी आपल्या कामाचं निवेदन त्याने अजितदादांना दिलं. ‘माझे पैसे एका व्यक्तीकडे अडकले आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो ती यामध्ये लक्ष घालून मला सहकार्य करावं’, अशी विनंती संबंधित व्यक्तीने अजितदादांकडे केली. निवेदन पाहून अजितदादा भडकले. त्यावर ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, अशा शब्दात अजितदादांनी संबंधित व्यक्तीला सुनावलं.

‘बेकायदेशीर व्यवसाय कोण करत असेल, सावकारी करत असेल तर त्याला मोक्का लावला जाईल’, असा सज्जड दम अजितदादांनी यावेळी दिला. ‘चांगल्या सवयी लावा, नको ती कामे घेऊन येऊ नका. उपमुख्यंत्री काय वसुली करायला बसला नाही’, असं अजितदादा म्हणाले.

WhatsAppShare