धोनी निवृत्त अजिबात होत नाहीए- रवी शास्त्री

68

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ठामपणे फेटाळून लावली आहे. ‘या सगळ्या गावगप्पा आहेत. धोनी निवृत्त वगैरे अजिबात होत नाहीए,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अत्यंत संथ फलंदाजी केल्याने धोनी टीकेचा धनी ठरला होता. सोशल मीडियातून त्याला निवृत्तीचे सल्लेही देण्यात आले होते. त्यातच तिसरी वन-डे संपल्यानंतर धोनीने पंचांकडून चेंडू मागून घेतला. कसोटीतून निवृत्तीची घोषणा करण्याआधीही त्यानं अशीच काहीशी कृती केली होती. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले. धोनीने निवृत्तीचे संकेत दिल्याचे बोलले जात होते.

रवी शास्त्री यांनी मात्र, या सगळ्या वावड्या असल्याचे म्हटले आहे. ‘धोनीला तो चेंडू भारत अरुण यांना दाखवायचा होता. चेंडूच्या स्थितीवरून पंचांना एकूण वातावरणाची कल्पना यावी हा त्याचा हेतू होता. त्यासाठीच पॅव्हेलियनकडे जाताना धोनीने तो चेंडू मैदानावरील पंचांकडून मागून घेतला होता. त्याला कुठलाही संकेत द्यायचा नव्हता,’ असे शास्त्रींनी सांगितले. ‘धोनीच्या क्षमतेवर विश्वास असल्याच्या कोहलीच्या मताचाही त्यांनी पुनरुच्चार केला. धोनीवर टीका झाली म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही, असेही ते म्हणाले.