धोनी धोनीप्रमाणे मोदी मोदी ओरडलात; पण शेवटी काय झाले ? – राज ठाकरे

857

पुणे, दि. २३ (पीसीबी) – धोनी धोनी प्रमाणे मोदी मोदी ओरडलात, पण शेवटी काय झाले, मोदींनी पहिली कुऱ्हाड व्यापाऱ्यांवरच मारली ना, असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मी कोणत्याही धर्म, जातीच्या विरोधात नाही, मला प्रत्येक जात आवडते, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी बुधवारी पुण्यातील जैन समाजातील मंडळींची भेट घेतली. मुकुंदनगर येथील सभागृहात एक कार्यक्रमही पार पडला. यात भाषण करताना राज ठाकरे म्हणाले, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत ‘केम छो’ असे म्हणत केले होते. तुम्हाला ते आवडलेही असेल, पण मला ते आवडले नाही. भारताच्या पंतप्रधानांवर कोणत्याही राज्याचा शिक्का नसावा. त्यांच्यावर देशाचाच शिक्का असायला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मनमोहन सिंग यांचे स्वागत कधी पंजाबी भाषेत केले आहे का?, अमेरिकेचे लोक हुशार आहेत. एखाद्या व्यक्तीसमोर काय बोलावे म्हणजे तो खूश होईल हे त्यांना माहित आहे, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले. जैन मुनींनी यांनी भाजपाचा का प्रचार करावा, तुम्ही मुनी आहात मग पक्षाचा प्रचार का करता, याचा जाब जैन समाजानेच विचारला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

बुलेट ट्रेनला माझा विरोध कायम असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. देशात जातीय तेढ वाढली असून मी लहान असताना माझे वर्गमित्र विविध जातीतील होते. पण त्यावेळी माझ्या मनात त्यांच्या जातीचा कधीही विचार आला नव्हता. मला सर्व जाती आवडतात, कारण प्रत्येक जातीतील जेवण चांगल असते, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.