धोनी धावबाद होणे हा नशिबाचा भाग होता- गप्टिल

196

लंडन, दि. १३ (पीसीबी) – न्यूझीलंडचा खेळाडू मार्टिन गप्टिलने वर्ल्डकप उपांत्य फेरीत महेंद्रसिंग धोनीला धावचीत केल्याचा प्रसंग प्रचंड चर्चिला गेला. धोनी त्याक्षणी धावचीत झाल्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले, असा निष्कर्षही काढला गेला. त्यावर स्वतः गप्टिल मात्र म्हणतो की, तो केवळ नशिबाचा भाग होता. गप्टिलने फेकलेला चेंडू थेट यष्ट्यांवर आदळला. धोनीला क्रीझमध्ये पोहोचण्यास काही इंच कमी पडले. त्यानंतर भारताकडे उरलेले लक्ष्य पार करण्यासाठी फलंदाज शिल्लक नव्हता. त्यामुळे भारताला १८ धावांनी हार पत्करावी लागली.

गप्टिल त्याबद्दल म्हणतो की, चेंडू माझ्याकडे येत आहे असे मला वाटलेही नव्हते. पण मी चेंडूच्या दिशेने जेवढे लवकर पोहोचता येईल, तेवढा प्रयत्न केला. मी जेव्हा चेंडू हातात घेतला तेव्हा तो सरळ रेषेत फेकता येईल असे मला वाटले. मी चेंडू यष्टीच्या दिशेने फेकला तेव्हा नशिबाने तो यष्टीवर जाऊन आदळला.

गप्टिलच्या या अचूक चेंडूफेकीमुळे धोनी बाद झाला आणि भारताचे फलंदाजीतील आव्हानही संपुष्टात आले. धोनीने ७२ चेंडूंत ५० धावांची खेळी केली. त्याआधी, धोनी आणि रवींद्र जाडेजा यांनी सातव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडच्या तोंडचे पाणी पळवले होते. भारताची अवस्था ६ बाद ९२ अशी असताना या जोडीने सूत्रे हाती घेतली होती.