धुळ्यात संतप्त आंदोलकांकडून खासदार हीना गावितांच्या कारची तोडफोड

299

धुळे, दि. ५ (पीसीबी) – मराठा समाजाच्या आंदोलकांचे म्हणणे ऐकण्यास लोकप्रतिनिधींनी नकार दिल्याने संतापलेल्या आंदोलकांनी आज (रविवार) खासदार हीना गावित यांच्या गाडीची तोडफोड केली. या घटनेमुळे जिल्हा नियोजन समितीस उपस्थिती सर्व आमदार जिल्हाधिकारी कार्यालयात अडकून पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसीची बैठक होती. या बैठकीसाठी खासदार हीना गावित, आमदार कृणाल पाटील, जयकुमार रावल, सुभाष भामरे, अनिल गोटे आदी उपस्थित होते. बैठक सुरू होण्याआधीपासूनच मराठा आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते. बैठक झाल्यानंतर सर्वप्रथम बाहेर आलेल्या खासदार गावित यांना आंदोलकांनी रोखले. त्यांनी आरक्षणाबाबत चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला. तसेच, पोलिसांनीही आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण तापले. संतापलेल्या आंदोलकांनी गावित यांच्या गाडीची तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला.

बाहेर परिस्थिती चिघळल्याने बैठकीसाठी आलेले अन्य आमदार जिल्हाधिकारी कार्यालयातच अडकून पडले आहेत. आमदारांना बाहेर पडू देणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. आंदोलकांमध्ये मोठ्या संख्येने महिलांचा समावेश आहे.