धनगर आरक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमधील समाजबांधवांचे आमदार लक्ष्मण जगताप यांना निवेदन

248

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील धनगर समाज बांधवांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीचे निवेदन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना सोमवारी (दि. १३) दिले. धनगर समाजावर आजपर्यंत झालेला अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार जगताप यांनी दिले.

जुनी सांगवी येथील राजमाता अहित्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून धनगर समाज बांधवांनी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. तसेच या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या युवकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अहिल्यादेवी होळकर पुतळा ते शितोळे चौक ते साई चौक ते कृष्णा चौक ते काटेपुरम चौकमार्गे पिंपळेगुरव येथील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.

तेथे आमदार जगताप यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. तसेच मनोजकुमार मारकड यांनी आमदार जगताप यांना पिवळा पंचा घालून आंदोलन करण्याचे कारण व नियोजनाची माहिती दिली. आमदार जगताप यांनी निवेदन स्वीकारून त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, डॉ. अतुल होळकर, सचिन सरक, रामेश्वर हराळे, संतोष काशिद, संतोष वाघमोडे, बाबासो चितळकर, मारूती काळे, बिरू व्हनमाने, विकास येळगे, सूर्यकांत गोफणे, अभिमन्यू गाडेकर, छगन वाघमोडे, नवनाथ भिटे, डॉ. दिनेश गाडेकर, संदिपान सामसे, मेजर गोफणे, नारायण मदने,  योगेश तरंगे, संतोष मदने यांच्यासह सांगवी व पिंपळेगुरव परिसरातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.