धनंजय मुंडेंच्या ताफ्यातील कारचा लोणावळ्याजवळ अपघात; अंगरक्षक आणि कारचालक जखमी

167

पुणे, दि. ८ (पीसीबी) –  विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील एका कारचा आज (रविवार) सकाळी साडेसातच्या सुमारास लोणावळ्याजवळ अपघात झाला. या अपघातातून धनंजय मुंडे थोडक्यात बचावले असून दोन चालक आणि एक अंगरक्षक जखमी झाला आहे. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी धनंजय मुंडे मुंबईला जात असताना हा अपघात झाला. अपघातग्रस्त कारमध्ये मुंडे नव्हते तर, त्यापुढे असलेल्या दुसऱ्या कारमध्ये ते होते. मुंडे यांना या अपघातात कुठलीही इजा झालेली नसून ते सुरक्षितरित्या मुंबईला पोहोचले आहेत.  (एमएच/४४/टी७) असा अपघातग्रस्त कारचा नंबर असून त्यामध्ये असलेले दोन चालक आणि एक अंगरक्षक यांच्या हाता पायाला थोडासा मुका मार लागला आहे. जखमा गंभीर नसून त्यांच्यावर संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.चालक व्यंकट गित्ते, चालक संतोष जाधव, अंगरक्षक सोपान चाटे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.