धक्कादायक; समलिंगी संबंध असलेल्या मुलींना तरूणांकडून मारहाण

211

लंडन, दि.८ (पीसीबी) – लंडनमध्ये समलिंगी संबंध असलेल्या दोन मुलींना चार विकृत मनोवृत्तीच्या तरूणांनी मारहाण केल्याची घटना या आठवड्यात घडली होती. या चारही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. लंडनमध्ये दोन मजली बसच्या वरच्या मजल्यावर लेस्बियन असलेल्या दोन मुली प्रवास करत होत्या. रात्रीच्या वेळी बसमध्ये कुणी नव्हते, केवळ १५ ते १८ वयोगटातील चार तरूण होते.

या तरूणांच्या या मुली कपल असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच त्यांना एकमेकांना किस करण्यास सांगितले. याला नकार दिल्यावर चौघा तरूणांनी या मुलींना बेदम मारहाण केली. आणि त्यांच्याजवळच्या पर्स घेऊन पोबारा केला. मुलींनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दखल घेत चार तरूणांना अटकही केली आहे.

लंडनमधील होमोफोबिक हेट क्राइम्समध्ये गेल्या चार वर्षांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०१८ मध्ये पोलिसांकडे अशा प्रकारच्या २,३०८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २०१४ मध्ये हे प्रमाण १,४८८ इतके होते. बळी पडणारे गे आणि लोकं मोठ्या प्रमाणावर करत असलेल्या तक्रारींमुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांनी सांगितले. ही ताजी घटना घडली तेव्हा या मुली शांतपणे बसमध्ये बसल्या होत्या. आणि हे चार तरूण अश्लील शेरेबाजी करत त्यांच्याकडे गेले असं पोलिसांनी सांगितलं.

या मुलींच्या चेहऱ्यावर अनेक गुद्दे मारण्यात आले त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या मुलींपैकी मेलनिया गेमाँट या मुलीनं फेसबुक पेजवर त्यांचा फोटो शेअर केला असून त्यावरून या निर्घृण हल्ल्याची कल्पना येते. आपली मैत्रिण ख्रिस हिच्यासमवेत जात असताना हा प्रकार घडल्याचे तिनं बीबीसी रेडिओ ४ शी बोलताना सांगितलं. आम्ही कपल आहोत हे समजल्यानंतर ते तरूण लगेच आले आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला असं तिनं सांगितलं आहे.