धक्कादायक : श्रीमंत होण्यासाठी टेलरने केली तब्बल ३३ ट्रकचालक आणि क्लिनर्सची हत्या

954

भोपाळ, दि. १२ (पीसीबी) – झटपट श्रीमंत होण्यासाठी व्यवसायाने टेलर असलेल्या एका व्यक्तीने आपल्या टोळीसह मिळून ८ वर्षांत तब्बल ३३ ट्रकचालक आणि क्लिनर्सची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या टोळीने मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, नाशिकसहित अनेक शहरांमध्ये हत्या केल्या आहेत.

आदेश खांब्रा असे ३३ ट्रक चालकांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरचे नाव आहे. याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी आदेश खांब्रासहित एकूण नऊ जणांच्या टोळीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक, क्लिनर्सना गुंगीचे औषध देऊन त्यांची हत्या करुन लुटणे ही या टोळीची मोडस ऑपरेंडी होती. जयकिरण प्रजापती आणि आदेश खांब्रा हे दोघे या टोळीचे म्होरके होते. खांब्रा याला प्रत्येक हत्येसाठी ५० हजार रुपये मिळायचे. अटक केल्यानंतर आदेश खांब्रा याने आपण टोळीसोबत मिळून एकूण ३३ ट्रकचालक आणि क्लिनर्सची हत्या केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे आदेश खांब्राचे नाव कोणत्याही वॉण्टेड लिस्टमध्ये नव्हते. खांब्रा याने दिलेल्या कबुलीनुसार, मध्य प्रदेशात १५, महाराष्ट्रात ८, छत्तीसगडमध्ये ५ आणि ओडिशामध्ये दोन हत्या करण्यात आल्या. इतर हत्या कुठे झाल्यात याची माहिती पोलीस घेत आहेत. भोपाळ पोलिसांनी जिथे हत्या झाल्या आहेत त्या राज्यांना पत्र लिहून छडा न लागलेल्या ट्रकचालक आणि क्लिनर्सच्या हत्येची माहिती मागवली आहे.