धक्कादायक : लाईव्ह भाषणा दरम्यान  व्हेनेजुएलाच्या राष्ट्रपतींवर ड्रोन हल्ला

475

कराकस, दि. ५ (पीसीबी) – लाईव्ह भाषण सुरु असताना व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्यावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. शनिवारी झालेल्या या घटनेत निकोलस मादुरो थोडक्यात बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो हे राजधानी कराकस येथे आपल्या लष्कराच्या शेकडो शिपायांसमोर भाषण करत असताना त्यांच्यावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रपती निकोलस मादुरो हे या हल्ल्यातून थोडक्यात बचावले असून ते सुरक्षित आहेत, मात्र  सात सुरक्षारक्षक या घटनेत जखमी झाले.

ड्रोनमध्ये स्फोटके भरुन राष्ट्रपतींना लक्ष्य करण्याच्या दृष्टीनेच हा हल्ला करण्यात आला होता, पण फायर फायटर्सने हा प्रयत्न हाणून पाडला. हा हल्ला एवढा जबरदस्त होता कि कार्यक्रमाच्या आसपास असलेल्या नागरिकांच्या घराच्या काचाही फुटल्या. हल्ला नेमका कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही, मात्र राष्ट्रपतींवर हल्ल्यासाठी विरोधी पक्षांच्या आंदोलकांवर सरकारकडून आरोप केले जात आहेत. तसेच जगभरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.