धक्कादायक: माजी मंत्र्याच्या नोकराने सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन केली हत्या

68

हरियाणा, दि. ७ (पीसीबी) – हरियाणाचे माजी मंत्री निर्मल सिंह यांच्या फार्म हाउसवरील एका नोकराने सहा वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तीची हत्या केल्याची कबूली दिली आहे. घोड्यावर उपचार करण्याआधी दिले जाणारे नशेचे इंजेक्शन त्याने मुलीला दिले. त्यानंतर स्वतः दारू पिऊन त्याने तिच्यासोबत बलात्कार केला आणि नंतर तिचा गळा कापून खून केला.

याप्रकरणी देवी असे अटक करण्यात आलेल्या आरोपी नोकराचे नाव आहे.

पोलिस अधिक्षक राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या जैसलमेर येथील रहिवासी असलेला आरोपी देवी हा गेल्या अकरा वर्षांपासून निर्मल सिंह यांच्या फार्म हाउसवर काम करतो. मुलीसोबत तीनवेळेस दुष्कर्म केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले. दिलेल्या इंजेक्शनमुळे मुलीचा मृत्यू झाला असावा असा त्याचा अंदाज होता, पण मुलीला थोडी शुद्ध येताना पाहून त्याने चाकूने मुलीचा गळा कापून तिचा खून केला. मुलीचा खून झाल्यामुळे पोलिस आता फार्महाउसवर काम करणाऱ्या सर्वांचीच चौकशी करतील म्हणून त्याने स्वतःला इजा पोहोचवली आणि तो रुग्णालयात भरती झाला. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. अखेर बुधवारी पोलिसांनी त्याला अटक केली आणि चौकशी दरम्यान त्याने ही धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.