धक्कादायक; मतदानाच्या आदल्या दिवशीच मतदारांच्या बोटावर जबरदस्तीने शाई  

92

लखनऊ, दि. १९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान आज (रविवार)  सुरु आहे. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशीच मतदारांच्या बोटावर जबरदस्ती शाई लावल्याचा  धक्कादायक  प्रकार चंदौली येथून  समोर आला आहे. जबरदस्ती शाई लावण्यासोबतच मतदाराच्या हातात ५०० रुपयेही देण्यात आले आहेत.

चंदौली लोकसभा क्षेत्रातील ताराजीवनपूर गावात दलित वस्तीतील नागरिकांनी भाजपा कार्यकर्त्यांवर मत न देण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप लावला आहे. मत देण्यासाठी आम्हाला केवळ पैसेच दिले नाहीत तर मतदान करु नये,  म्हणून बोटाला शाई देखील लावण्यात आल्याचे गावकरी सांगतात. कोणाला याबद्दल सांगू नका, असे म्हणत पाचशे रुपये दिल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.

मतदारांच्या बोटांच्या शाईचे फोटो समोर आले आहेत. तसेच त्यांना देण्यात आलेली कथित रक्कम देखील यामध्ये दिसत आहे. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमच्या बोटावर जबरदस्ती शाई लावण्यात आल्याचे तक्रारदारांनी  म्हटले आहे. तर अजूनही त्यांना स्वत:च्या मतदानाचा हक्क बजावता येईल, असे सांगितले जात आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास  केला जात आहे.