धक्कादायक, भाजप चिंचवड विधानसभा निरीक्षकांना जिल्हाध्यक्षांनीच ठगवले…

0
80

– विरोधात गेल्याने नगरसेवक, इच्छुकांना महत्वाच्या बैठकिसाठी डावलले

पिंपरी, दि. 01 (पीसीबी) : भाजपने अपेक्षित १५० विधानसभा मतदारसंघात पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली असून त्यांच्याकडून पाहणी अंती उमेदवारीसाठी तीन नावे मागविली आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक जगदिश मुळीक आणि प्रभारी प्रदिप सिंग जाडेजा यांच्या उपस्थिती एक बैठक आज दुपारी १२ वाजता पार पडली. धक्कादायक प्रकार म्हणजे या बैठकिला आपल्याला विरोध होईल म्हणून आजी-माजी नगरसेवक आणि इच्छुकांना डावलण्यात आले आणि त्यांच्या जागेवर दुसरे डमी लोक उपस्थित दाखवून निरीक्षकांची दिशाभूल करण्यात आल्याचे उघड झाले. दरम्यान, या संदर्भात पीसीबी प्रतिनिधीने निरीक्षक मुळीक यांना विचारणा केली असता, तेसुध्दा अनभिज्ञ असल्याचे जाणवले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात चाचपणी करण्यासाठी निरीक्षक जगदिश मुळीक आणि प्रभारी प्रदिप सिंग जाडेजा शहरात आले होते. पक्षाने ठरविल्यानुसार या बैठकिसाठी सर्व आजी-माजी नगरसेवक, आजी-माजी आमदार, खासदार, इच्छुक उमेदवार, पक्षाच्या सर्व आघाड्यांचे अध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि त्यांची कार्यकारणी, मंडल अध्यक्ष आणि त्यांची कार्यकारणी, प्रभाग अध्यक्ष अशा सर्वांना पाचारण करण्याची आवश्यकता आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे २०२२ मध्ये मुदत संपलेले ३३ माजी नगरसेवक, २३ वर पूर्वाश्रमिचे माजी नगरसेवक आहेत. विधानसभा लढविण्यासाठी शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह आमदार आश्विनी जगताप, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, सिध्देशवर बारणे हे तीव्र इच्छुक आहेत.

सर्वांच्या निमंत्रणाची जबाबदारी शहर जिल्हाध्यक्षांची असते. प्रत्यक्षात बहुसंख्य माजी नगरसेवकांनी शंकर जगताप यांच्या उमेदवारीला कडवा विरोध केल्याने एकालाही बैठकिसाठी बोलावले नाही. इच्छुकांपैकी स्वतः जगताप, त्यांच्या भावजय म्हणून आमदार आश्विनी जगताप आणि नव्यानेच काळुराम बारणे यांचे नाव दाखवून ते उपस्थित होते. काही नेत्यांचे वाहनचालक, स्वीयसहाय्यक हे पदाधिकारी म्हणून गर्दी करायला आले होते. निरीक्षक जगदिश मुळीक यांना कोणाचा विशेष परिचय नसल्याने त्यांनाही आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले नाही. बैठकिला उपस्थितीत सर्वांनी आमदारकीसाठी कोण उमेदवार पाहिजे ती तीन नावे बंद लिफाफ्यात निरीक्षकांकडे द्यायची होती.

गेल्या महिनाभरात शंकर जगताप यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच जोरदार विरोध सुरू झाल्याने विरोध करणाऱ्यांना पध्दतशीर डावलण्यात आले. आपल्या विरोधात घोषणा, भाषणबाजी होईल या भितीनेच शंकरशेठ जगताप यांनी माजी नगरसेवक आणि इच्छुकांना बोलावले नाही, असे उपस्थितांपैकी एकाने सांगितले.
सर्वात गंमतीचा भाग म्हणजे बंद लिफाफ्यात तिसरे नाव काळुराम बारणे यांचे देण्याचे आदेश खुद्द शहराध्यक्षांनी दिले होते. या संदर्भात बारणे यांना विचारले असता ते म्हणाले, मलाही माहित नाही. मला तीन आपत्य असल्याने मी पात्र होत नाही. माझे नाव टाकल्याचे समजल्यावर मलाही हासू आवरले नाही. अहो, मी फक्त चिंचवड मतदारसंघाचा प्रमुख म्हणून बैठकिला होतो. तसे तर इच्छुक सगळेच असतात.

भाजपचे निरीक्षक जगदिश मुळीक यांना या सर्व प्रकऱणाबद्दल विचारले असता ते स्वतः गडबडले. ते म्हणाले, बैठकिला नगरसेवक, सर्व इच्छुकांना बोलावले होते, मात्र त्याबाबत आमचे जिल्हाध्यक्षच सांगू शकतील. कारण ही जबाबदारी त्यांची असते. मला माहित नव्हते आता मी जिल्हाध्यक्षांना विचारून आपल्याला कळवतो. दरम्यान, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते म्हणाले, आम्ही रोखठोक बोलतो, विरोध करतो म्हणून आमचे नाव निमंत्रण यादितून वगळले. मी लेखी तक्रार केली आहे, आता वरिष्ठांना पाठविणार आहे.