धक्कादायक: बॉयफ्रेण्डच्या मदतीने लेकीने केला आई-वडिलांचा खुन

121

दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – बॉयफ्रेण्डच्या मदतीने पोटच्या मुलीने आई-वडिलांचा खुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील पश्चिम विहार परिसरात घडली.

गुरमीत सिंग (वय ५४) आणि जगीर कौर (वय ४३) असे खून झालेल्या आई-वडिलांची नावे आहेत.  याप्रकरणी मुलगी दविंदर आणि तिचा बॉयफ्रेण्ड प्रिन्स दीक्षित या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दविंदर आणि तिचा बॉयफ्रेण्ड प्रिन्स दीक्षितने गुरमीत सिंग यांना गुंगीचं औषध देऊन नाक दाबून त्यांची हत्या केली होती. त्यांचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन एका गटारात फेकून देण्यात आला. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीने २१ फेब्रुवारी ते २ मार्च असे तब्बल दहा दिवस हा लपंडाव सुरु ठेवला. दोन मार्चला जगीर कौर यांनाही दविंदर आणि प्रिन्स दीक्षितने त्याच पद्धतीने मारले. आठ दिवसांनी पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दिल्लीच्या पश्चिम विहार भागातील ५० लाख रुपये किमतीचे घर विकण्यासाठी दोघांनी आई-वडिलांना जीवे मारल्याचा आरोप आहे.

दविंदरचा घटस्फोट झाला असून तिला तीन आणि पाच वर्षांची मुले आहेत. नवऱ्याला सोडून माहेरी आलेली दविंदर वर्षभरापूर्वी आई-वडिलांच्या घरातूनही बाहेर पडली होती. नोकरी शोधताना तिची ओळख प्रिन्सशी झाली. दविंदर आणि प्रिन्स यांचे नाते गुरमीत-जगीर यांना मान्य नव्हते. ते कायम लेकीला त्यावरुन सुनवत असत. सहा महिन्यांपूर्वी दोघांनी संपत्ती गिळंकृत करण्यासाठी गुरमित-जगिर यांच्या हत्येचा कट रचला. विशेष म्हणजे गुरमीत आणि जगीर यांना आणखी तीन मुले आहेत. मात्र आपल्या आई-वडिलांच्या जीवाचे बरे वाईट झाल्याची कुणकुणही त्यांना लागली नव्हती. दिल्ली पोलीस तपास करत आहेत.