धक्कादायक: पुण्यात अडीच महिने घरात डांबून इंजिनीअर तरुणीवर बलात्कार

0
3991

पुणे, दि. ५ (पीसीबी) – लग्नास नकार दिल्याच्या रागातून पुण्यातील एका २७ वर्षीय इंजिनीअर तरुणीला अडीच महिने घरात डांबून ठेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर आरोपीने तरुणीवर बलात्कार करतानाचा व्हीडीओ देखील काढला आहे. ही घटना कोथरुड परिसरात घडली.

याप्रकरणी सय्यद आमीर हुसेन (रा. अंधेरी) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आरोपी सय्यद याची पिडीत २७ वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली होती. तरुणी आरोपी हुसेनच्या घरी गेली तेव्हा तिला गोड पदार्थ खाण्यासाठी देण्यात आला. त्यामध्ये गुंगीचे औषध मिसळण्यात आले होते. तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तरुणी शुद्धीत आल्यानंतर आरोपी हुसेनने तिला मोबाइलमध्ये बलात्कार करतानाचा शूट केलेला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करत कोथरुड परिसरातील एका घरात डांबून ठेवले आणि तब्बल अडीच महिने तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर आरोपी तरुणीला चामडी पट्ट्याने मारहाणही करत होता. त्याने तरुणीचे डेबिट कार्ड काढून घेत त्यातून ४० हजार रुपये देखील काढून घेतले होते. याप्रकरणी १ सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला.  प्रकरण ओशिवारा पोलिसांकडे सोपवण्यात आले असून ते तपास करत आहेत. आरोपी हुसेनला अंधेरी न्यायालयात हजर केले असता त्याला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.