धक्कादायक: निगडीत अॅमेझॉनवरुन मागवला ३६ हजारांचा कॅमेरा; मात्र प्रत्यक्षात मिळाली विट आणि दगडं

170

निगडी, दि. १२ (पीसीबी) – अॅमेझॉन या ऑनलाई शॉपिंग साईटवरुन वस्तू मागवणे एका ग्राहकाला चांगलेच महागात पडले आहे. कारण ३६ हजार ४९५ रुपयांच्या कॅमेऱ्या ऐवजी ग्राहकाला प्रत्यक्षात विट आणि दगड मिळाले. ही धक्कादायक घटना ६ जून रोजी निगडी येथे घडली.

याप्रकरणी सौरभ नाईक (रा. प्राधिकरण, सेक्टर नंबर २५) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ नाईक यांना बाहेरगावी जायच असल्याने त्यांनी अॅमेझॉन या ऑनलाई शॉपिंग साईटवरुन Canan EOS 1500 D (डीएसएलआर) हा कॅमेरा २ जून रोजी ऑर्डर केला होता. या कॅमेऱ्याची किंमत ३६ हजार ४९५ रुपये आहे. कॅमेऱ्याची सर्व रक्कम त्यांनी डिलिव्हरी होण्यापूर्वीच ऑनलाईन पध्दतीने जमा केली होती. त्यानंतर मागवलेला कॅमेरा ६ जून रोजी मिळणार असल्याचा मेसेज त्यांना आला. ६ जून रोजी अभिषेक काटे नावाचा डिलिव्हरी बॉय सौरभ यांनी मागवलेल्या कॅमेऱ्याचे पार्सल घेऊन आला. त्याने पार्सल दिले. ओटीपी घेतला आणि निघून गेला. सौरभ यांनी पार्सल घरात आणले. घरातील सर्वांच्या उपस्थितीत पार्सल फोडले. त्यामध्ये कॅमेरा ठेवण्याची बॅग काही कागदे आणि वीट व दगड आढळून आली.  याबाबत त्यांनी तात्काळ निगडी पोलिसात धाव घेतली. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांची भेट घेतली. त्यांना याबाबत तक्रार अर्ज दिला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, सौरभ यांनी ई-मेल आणि ट्वीटरच्या माद्यमातून अॅमेझॉन कंपनीसोबत संपर्क साधला आहे. मात्र त्यावरही कंपनीने त्यांचे अपेक्षीत समाधान केले नाही. सौरभ यांना कॅमेऱ्याची जास्त गरच असल्याने त्यांनी त्याच मॉडलचा कॅमेरा एका दुकानातून प्रत्यक्षात जाऊन विकत घेतला आहे.