धक्कादायक : धायरीत प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी प्रियकराने घडवला बॉम्ब ब्लास्ट

324

पुणे, दि. १० (पीसीबी) – प्रेमभंग झाल्याने प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी प्रियकराने मित्राची मदत घेऊन प्रेयसीच्या घरा जवळ एक जोरदार बॉम्ब ब्लास्ट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.८) पहाटे तीनच्या सुमारास डी एस के रोड धायरी येथे घडली. स्फोटाची तिव्रता इतकी जोरदार होती कि परिसरात बॉम स्फोट झाल्याची अफवा पसरली होती. तर एका घराची खिडकीची काच देखील फुटली होती.  

सिंहगड पोलिसांनी या प्रकरणी किशोर आत्माराम मोडक (वय २०) आणि अक्षय राजाभाऊ सोमवंशी (वय २४), (दोघेही रा. वडकी सासवड रोड) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डी एस. के रोड धायरी येथे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मोकळ्या जागेत स्फोट होऊन परिसरातील रामकृष्ण पेटकर यांच्या घराची काच फुटली होती. त्यामुळे त्यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळाच्या जवळपासच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास लावत दोन तरुणांना सासवड येथील वडकी या गावातून अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती सुझूकी ए स्टार (एमएच/११/एके/६९३८) कारही जप्त केली.

पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता आरोपी किशोर मोडक याची मावशी धायरी परिसरात राहते. गेल्या दोन वर्षांपासून किशोरचे मावशीच्या घरी येणे जाणे होते. यादरम्यान मावशीच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणीसोबत किशोरचे प्रेमसंबंध जुळले. मात्र  काही कारणास्तव त्यांचे प्रेमसंबंध तुटून किशोरचा प्रेमभंग झाला. याच्या रागातून प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी मित्र अक्षयच्या मदतीने धायरी परिसरात फटाक्याच्या दारूने आणि छऱ्याचा उपयोग करुन एका काडीपेटीच्या आकाराचा बॉम्ब बनवला आणि स्फोट घडवला. पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली आहे. सिंहगड पोलीस  तपास करत आहेत .