धक्कादायक; चाळीस लाखांच्या खंडणीसाठी मित्रानेच केला मित्राचा खून

212

दापोडी, दि.१३ (पीसीबी) – चाळीस लाख रूपयांच्या खंडणीसाठी मित्रानेच मित्राचे अपहरण करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक घटना रविवार दि.१२ रोजी पहाटेच्या सुमारास पुणे येथे उघडकीस आली.

अब्दुलआहाद सय्याब सिद्दिकी (वय.१७, रा. कलागौरव कॅम्प्लेक्स, पिंपळेगुरव रोड,दापोडी) असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुलआहाद आणि आरोपी उमर नासिर शेख (वय १९ वर्षे, रा.इंदिरानगर वसाहत, रेल्वे पटरी शेजारी, खडकी.पुणे) हे मित्र होते. उमर याने शनिवारी (दि.११) रोजी रात्री आठच्या सुमारास अब्दुलआहाद याला पार्टीच्या बहाण्याने पुणे विद्यापीठातील निर्जन ठिकाणी घेऊन गेले असता. अब्दुलआहाद फोनवर बोलत असताना आरोपी उमरने पाठीमागून धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्याच्या खून केला. अब्दुलआहाद मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर उमरने त्याच्याच मोबाईलवरून अब्दुलआहाद च्या घरच्यांना फोन केला. ‘अब्दुलआहाद मेरे कब्जे में है, मरे को चालीस लाख रूपये दो, और उसको लेके जाओ’ अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे सिध्दिकी कुटुंबीय घाबरले. त्यांनी खडकी, कासरवाडी, दापोडी, बोपोडी परिसरात अब्दुलआहादचा शोध घेण्यास सुरूवात केली; मात्र तो सापडला नाही. अब्दुलआहादचा मोठा भाऊ रिजवान यांनी पुन्हा फोन केला असता ‘ चालीस लाख रूपये देने के बाद तुम्हारे भाई को सलामत घर पे छोडता हूँ, कल फोन करता हूँ, असे म्हणून आरोपी उमरने फोन बंद केला.

शेवटी सिध्दिकी कुटुंबीयांनी रात्री साडेअकराच्या सुमारास भोसरी पोलिस स्टेशनला धाव घेत या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत आरोपीस राहत्या घराजवळून ताब्यात घेतले. चाळीस लाख रूपयाच्या खंडणीसाठी आपणच अब्दुलआहादचा दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पुणे विद्यापीठ येथून अब्दुलआहादचा मृत्यदेह ताब्यात घेतला. आरोपी उमर याने खंडणीसाठी खून केल्याची कबुली दिली असली, तरी पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर कैलास करीत आहेत.