धक्कादायक: घराच्या जागेत वाटा मिळत नसल्याने नातवाने केला आजोबांचा खून

102

घराच्या जागेत वाटा मिळत नसल्याने एका नातवाने त्याच्या आजोबांच्या डोक्यात विटा घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.१२) रात्री नऊच्या सुमारास हिंगोली जिल्हयातील कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर गावात घडली.

विठ्ठल धनवे असे मृत आजोबांचे नाव आहे. या प्रकरणी दत्ता धनवे या त्यांच्या नातवाला अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर या ठिकाणी विठ्ठल धनवे हे त्यांच्या नवनाथ नावाच्या मुलासोबत राहात होते. त्यांचा दुसरा मुलगा रामचंद्र धनवे हा त्याच्या पत्नी आणि मुलासह हनुमान गर भागात भाड्याच्या घरात राहतात. रामचंद्र धनवे आणि विठ्ठल धनवे यांच्यात घराच्या वाटणीवरून वाद होता. विठ्ठल धनवे नवनाथ धनवे सोबत त्यांच्या मालकीच्या घरात रहात होते. नवनाथ धनवे मागील महिन्याभरापासून हळद काढण्याच्या निमित्ताने एक महिन्यापासून बाहेरगावी कामावर गेला. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास विठ्ठल धनवे यांचा नातू दत्ता धनवे हा आजोबांकडे गेला होता.

दत्ता धनवे हा रामचंद्र धनवे यांचा मुलगा आहे. त्याचा गुरुवारी आजोबांसोबत घराच्या वाटणीवरून वाद झाला. दोघांचे भांडण विकोपाला गेले, ते सोडवण्यासाठी विठ्ठल धनवे यांची पत्नी म्हणजेच दत्ताची आजी कौशल्याबाई मधे पडली. मात्र संतापलेल्या दत्ताने आजीचे काहीही ऐकले नाही. आजोबा विठ्ठल धनवे यांच्या डोक्यात विटांचा मारा केला. त्यात विठ्ठल धनवे जखमी झाले. तर आजी कौशल्या धनवेही किरकोळ जखमी झाली. नातवाने आजोबांना केलेली ही मारहाण एवढी जबरदस्त होती की आजोबांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी दत्ता रामचंद्र धनवे यास पोलीसांनी अटक केली आहे. बाळापूर पोलीस तपास करत आहेत.