धक्कादायक; ग्राहकांसोबत शरीरसंबंधास नकार देणाऱ्या बार डान्सरला कपडे उतरवून मारहाण

187

हैदराबाद, दि.१७ (पीसीबी) – ग्राहकांसोबत शरीरसंबंधास नकार देणाऱ्या बार डान्सरला कपडे उतरवून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बार डान्सच्या चार महिला सहकारी आणि एका व्यक्तीकडून ही मारहाण करण्यात आली. हैदराबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पंजागुट्टा पोलिसांनी याप्रकरणी चार महिलांना अटक केली आहे. तर यामधील मुख्य आरोपी फरार आहे. त्याला अटक करण्याचे सर्व प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, ‘एका बार डान्सरने त्यांच्याकडे तक्रार केली आहे. तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार तिने काही महिन्यांपुर्वी बेगमपेठ परिसरातील एका बारमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून तेथील लोक तिच्यावर ग्राहकांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती करत आहेत. जेव्हा तिने नकार दिला तेव्हा तिच्या पाच सहकाऱ्यांनी कपडे काढून तिला मारहाण केली. यामध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश होता’.

‘काही दिवसांपासून बार व्यवस्थापनाने ग्राहकांना बारमध्ये येऊन शरीरसंबंध ठेवण्याची ऑफर देण्यास सुरुवात केली आहे’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकऱणी कारवाई करत मारहाण करणाऱ्या चार महिलांना अटक करण्यात आली आहे. तसंच तेलंगणाचे पोलीस महासंचालक महेंदर रेड्डी यांनी घटनेचा सविस्तर अहवाल देण्याचा आदेश दिला आहे.