धक्कादायक: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या नऊ नातेवाईकांचे केले अपहरण

190

श्रीनगर, दि. ३१ (पीसीबी) – काश्मीरच्या विविध भागातून दहशतवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या तब्बल नऊ नातेवाईकांचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पोलिस उपाधिक्षकांच्या भावाचा देखील समावेश आहे. ही घटना गुरुवारी (दि.३०) रोजी घडली. सुरक्षा संस्थांना याचा संबंध हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी सय्यद सलाहुदीनचा मुलगा सय्यद शकील अहमदच्या अटकेशी असल्याचा संशय आहे.

झुबेर अहमद बट, आरीफ अहमद शंकर, फैजान अहमद मकरू, समर अहमद राठेर, गोहर अहमद मलिक, यासीर अहमद बट, नासीर अहमद, शब्बीर अहमद जरगर, आसीफ अहमद राठेर असे दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या नऊ नातेवाईकांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी आतापर्यंत काश्मीरमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले करत होते. पण आता त्यांनी पोलिसांच्या नातेवाईकांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. २४ तासात एकाचवेळी नऊ नातेवाईकांचे अशाप्रकारे अपहरण करण्याची ही पहिली घटना असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी त्रालमधून एका पोलिसाच्या मुलाला आणि गंदेरबलमधून एका जवानाच्या कुटुंबातील सदस्याचे अपहरण केले होते. गंदेरबलमधून अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीला दहशतवाद्यांनी बेदम मारहाण करत सोडून दिले. त्यानंतर गुरुवारी रात्री पोलिसांच्या इतर सात नातेवाईकांचे शोपिया, कुलगाम, अनंतनाग, त्राल आणि अवंतिपोरामधून अपहरण करण्यात आले. त्यात पोलिस अपाधिक्षकांच्या भावाचाही समावेश आहे. भारतीय सुरक्षा संस्था त्यांचा शोध घेत आहेत.