धक्कादायक: आरोपींनी मागितले पाणी पोलिसांनी पाजली लघवी

136

अलिराजपूर, दि. १३ (पीसीबी) – पोलिस कोठडीत असलेल्या पाच आदिवासी आरोपींना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले असता पोलिसांनी त्यांना चक्क लघवी पाजली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील अलिराजपूर जिल्ह्यात घडली.

या पाच जणांवर पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात पोलीस ठाणे प्रमुखासह चार पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिराजपूर जिल्ह्यातील नानपूर पोलिसांनी पाच आदिवासी तरुणांना अटक केली होती. आरोपींपैकी एकाच्या बहिणीसोबत एक तरुण छेडछाड करीत होता. आरोपींनी त्याचा पाठलाग केला. त्यामुळे मदतीसाठी तो तरुण पोलीस ठाण्यात आला. तेव्हा आरोपींनी तिथे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणात त्या तरुणाने पाच जणांविरोधात तक्रार दिली नसली तरी तो घटनास्थळी होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, कोठडीत असताना पोलिसांनी पाच जणांना बेदम मारहाण केली. यावेळी त्यांनी पोलिसांना पिण्यास पाणी मागितले. पोलिसांनी मात्र त्यांना लघवी पाजली, असा आरोप या पाच जणांनी केला आहे. हे पाच जण आदिवासी असून त्यांना अलिराजपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.