धक्कादायक! अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून भोंदू बाबाने केला १२० महिलांवर बलात्कार

175

हिसार, दि. २१ (पीसीबी) – भोंदू बाबाने अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून सुमारे १२० महिलांवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हरणायातील टोहाना येथील बाबा बालकनाथ मंदिरात पुजारी असलेल्या अमरपुरी ऊर्फ बिल्लू याचा महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या बाबास बेड्या ठोकल्या. अधिक तपासादरम्यान  या बाबाचे सुमारे १२० महिलांसोबत शारीरिक संबंध बनवतानाचे व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले. 

अमरपुरी ऊर्फ बिल्लू हा प्रेतबाधा झाल्याचे सांगून महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर तंत्रमंत्रांच्या बहाण्याने तो महिलांना बेशुद्ध करणारे औषध पाजून त्यांच्यावर अत्याचार करत असे. मग अशा महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असे, तसेच त्यांना अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडत असे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या अमरपुरीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी  दोन महिला आणि  एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे.