‘धंदा करायचाय ना तर हप्ता द्यायलाच लागल’ असे म्हणत दहशत पसरवणा-या स्वयंघोषित भाईला अटक

857

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – हातात कोयता घेऊन महेशनगर नवीन चौपाटीवर येऊन स्वयंघोषित भाईने ‘धंदा करायचाय ना तर हप्ता द्यायलाच लागल’ अशी तिथल्या दुकानदारांना धमकी दिली. पोलिसांनी या भाईला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 2) रात्री घडली.

दीपक उर्फ दिप्या सुरेश मोहिते (वय 30, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय जानराव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशनगर येथील नवीन चौपाटीवर काही लहान दुकानदार व्यवसाय करतात. गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजता आरोपी कोयता घेऊन तिथे आला. ‘मी इथला भाई आहे. धंदा करायचाय ना तर हप्ता द्यायलाच लागल’, असे म्हणून शिवीगाळ व धमकी देत त्याने दहशत निर्माण केली.

पिंपरी पोलिसांनी स्वयंघोषित भाई दीपक याला अटक केली आहे. त्याच्याकडून 100 रुपये किमतीचा कोयता जप्त करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.