‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ सिनेमाचा दिग्दर्शक विजय गुट्टेला ३४ कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी अटक

50

मुंबई, दि. ३ (पीसीबी) –  ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या सिनेमाचा दिग्दर्शक विजय गुट्टे याला ३४ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी जीएसटीच्या इंटेलिजन्स विंगने अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांची कंपनी व्हीआरजी डिजिटल कॉर्प प्रायव्हेट लिमिटेडने होरायझन आऊटसोर्स सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून मिळालेल्या अॅनिमेशन आणि मॅनपॉवर सर्व्हिससाठी ३४ कोटी रुपयांच्या जीएसटीची खोटी कागदपत्रे देऊन घेतल्याचा आरोप आहे. महत्त्वाची बाब म्हणजे विजय यांनी या कंपनीकडून कोणतीही सेवा घेतली नव्हती. होरायझन नावाच्या या कंपनीविरोधात १७० कोटी रुपयांच्या खोट्या जीएसटी बिलाचा खटला सुरु आहे. ही  कंपनी अशाप्रकारे आपल्या ग्राहकांना बनावट जीएसटी बिल देऊन कोट्यवधींचा घोटाळा करत होती. विजय गुट्टे यांना जीएसटी कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. विजय गुट्टे तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचे सांगितले जात आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्याची रवानगी १४ ऑगस्टपर्यंत आर्थर रोज जेलमध्ये करण्यात आली आहे.

दरम्यान, विजय गुट्टे हे रत्नाकर गुट्टेंचे पुत्र आहेत. रत्नाकर गुट्टे यांच्यावरही ५५०० कोटींच्या बँक घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांनी परभणीतील गंगाखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.