दोन दिवसात गूड न्यूज मिळेल; अर्जुन खोतकरांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांचे सुचक विधान

33

औरंगाबाद, दि. १४ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दंड थोपटलेले शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांची औरंगाबादमध्ये भेट घेऊन बंद दाराआड आज (गुरूवार) चर्चा केली. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.  

या भेटीनंतर दोन दिवसात अर्जुन खोतकर यांच्याबद्दल गूडन्यूज मिळेल, असे सुचक विधान अब्दुल सत्तार यांनी केले आहे. अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार या दोघांमध्ये औरंगाबादच्या सातारा परिसरात तासभर चर्चा झाली. मात्र, चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही.

अब्दुल सत्तार  म्हणाले की, आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. दोघेही राजकीय क्षेत्रात एक आहोत, सुखदुःखात एकमेकांना मदत करतो. आज चर्चा काहीही असू द्या. मात्र लोकसभेच्या निकालानंतर नक्की आनंद होईल. आनंदाची बातमी नसती, तर आम्ही भेटलोच नसतो, असे  सत्तार म्हणाले.