दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर

63

हिंजवडी, दि. 26 (पीसीबी) : आर्थिक कारणावरून भांडण सुरु असताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये तरुणाची हाताची बोटे फ्रॅक्चर झाली. ही घटना 1 सप्टेंबर रोजी रात्री बालेवाडी फाटा, हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी 25 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशिक बाळू कांबळे (वय 25, रा. मेडद, ता. बारामती, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आनंदराव उर्फ बंटी रामचंद्र घोरपडे (रा. तांदुळवाडी, ता. बारामती, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आनंदराव आणि अनिल गुणवरे यांचे आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून वाद सुरु होता. आनंदराव याने त्याच्या इनोव्हा कार मधून लोखंडी रॉड काढून अनिल यांना मारहाण करत असताना फिर्यादी कांबळे हे भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने कांबळे यांच्या हातावर लोखंडी रॉडने मारून त्यांना जखमी केले. त्यात कांबळे यांच्या हाताच्या दोन बोटांना फ्रॅक्चर झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare