देहूरोडमधील  मामुर्डी गावच्या यात्रेदरम्यान सुरु असलेल्या तमाशा मधील गाण्यांवर नाचण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. ही घटना सोमवारी (दि.९) रात्री दहाच्या सुमारास मामुर्डी गावातील भैरवनाथ मंदिराच्या समोर घडली.

याप्रकरणी प्रमोद गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राजा राऊत, गोटू राऊत यांच्यासह १६ जणांविरोधात देहूरोड पोलीसात ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामुर्डी गावात दोन दिवसांपासून भैरवनाथाची यात्रा सुरु आहे. याच निमित्ताने तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी रात्री तमाशा सुरू झाला. यावेळी तमाशाचा अनंद घेण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी मामुर्डी गावातील भैरवनाथ मंदिरा समोर जमली होती.  यावेळी फिर्यादी प्रमोद गायकवाड आणि त्यांचे काही मित्र मंडळी तेथे होते, त्याचबरोबर राजा राऊत,गोटू राऊत त्यांचे मित्र देखील या लावणीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. फिर्यादी गायकवाडचे मित्र नाचत असताना संशयित आरोपी राजा राऊत आणि गोटू राऊत यांच्या मित्रांमध्ये नाचण्यावरून धक्काबुक्की झाली, यामुळे या दोनही गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यानुसार प्रमोद गायकवाड यांनी राजा राऊत, गोटू राऊत यांच्यासह १६ जणांविरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.  देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.