देहूरोडमध्ये ग्राहकाची दुकानदाराला मारहाण; सर्वप्रकार सीसीटीव्हीत कैद

92

देहूरोडमध्ये आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या बिलावरून ग्राहकाने दुकानदारास मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.८) संध्याकाळी सातच्या सुमारास देहूरोडच्या राजपुरोहित स्वीट्स या दुकानामध्ये घडली. हा सगळा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सुरेशकुमार राजपुरोहित (वय ३५, रा.देहूरोड) असे मारहाण झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी अतुलच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेशकुमार राजपुरोहित यांचे देहूरोड येथे राजपुरोहित स्वीट्स नावाचे दुकान आहे. रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ग्राहक अतुलने त्यांच्या दुकानातून आईस्क्रीम आणि चॉकलेट घेतले, मात्र याचे १२५ रुपये बिल देण्यास तो नकार देत होता. नेहमीच तो असे करायचा हे लक्षात आल्याने दुकानदाराने त्याला आधी पैसे देण्याची मागणी केली. त्यामुळे अतुलचा राग अनावर झाला. त्याने दुकानदारास शिवीगाळ करून काउंटरच्या आत येऊन हाताने मारहाण करत, मिठाईची नासधूस देखील केली. एवढेच नाही तर बाहेर आल्यानंतर देखील दुकानदाराला धक्काबुक्की केली होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीसात ग्राहक अतुल विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.