देहूगावात मंगळसुत्रासाठी विवाहितेचा खून; सासरा आणि दिराला अटक

664

देहूरोड, दि. १८ (पीसीबी) – माहेराहून पहिल्या पतीचे मंगळसूत्र आणण्यासाठी पतीसह सासरच्या लोकांनी चटके दिल्याने गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सासरा आणि दिराला अटक केली आहे. हा प्रकार देहूरोड जवळील चिंचोली येथे घडला आहे.

मोनिका सोमनाथ जाधव (वय ३१, रा. चिंचोली, देहूगाव) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मोनिकाचा पती सोमनाथ नारायण जाधव आणि सासू लक्ष्मीबाई नारायण जाधव, सासरे नारायण तुकाराम जाधव, दीर गणेश नारायण जाधव यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सासरे नारायण, दीर गणेश याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मोनिकाची आई शांता रमेश पोवार (वय ५१, रा. वारजे माळवाडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिकाचे सोमनाथ जाधव याच्याशी दुसरे लग्न झाले होते. माहेराहून पहिल्या पतीचे मंगळसूत्र आणण्यासाठी पती, सासू, सासरे हे मोनिकाला शारीरिक व मानसिक त्रास देत होते.  मात्र मोनिका मंगळसुत्र आणत नसल्याने तीला चटके देऊन जखमी केले होते.

चटके दिल्याने गंभीर जखमी झालेल्या मोनिकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू सोमवारी (दि.१३) तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतर जखमामुळेच मोनिकाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. देहूरोड पोलिस तपास करत आहेत.