देहुरोड येथून दहाचाकी ट्रक चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

319

देहुरोड, दि. २८ (पीसीबी) – देहुरोड परिसरात उभा असलेला दहाचाकी ट्रक चोरणाऱ्या चार जणांच्या टोळीला देहुरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून ट्रकही जप्त केला आहे.

मंगेश बाळासाहेब वाकडे (वय २३, रा. बीटरगाव, लातूर), विकास धीराम नायकवडे (वय २४, रा. सुलतानपूर, बीड), मारुती लहू कदम (वय २०, आंबील वडगाव, बीड) आणि विकास दत्तात्रय वाघमोडे (वय २७, रा. किट्टी आडगाव, बीड) असे अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत.

देहुरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुरोड परिसरात उभा असलेला एक दहाचाकी ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची तक्रार दाखल होती. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरु होता. यादरम्यान एका खबऱ्याने या गुन्ह्यातील आरोपी हे मोशी येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती देहुरोड पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी मोशीतील विविध ठिकाणी सापळा रचला. यावेळी एका इंडिका कारमधून काही तरुण संशयीतरित्या फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनीच देहुरोड येथे उभा असलेला दहाचाकी ट्रक चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून ट्रकही जप्त केला आहे. देहुरोड पोलिस तपास करत आहेत.