देश सोडण्यापूर्वी विजय मल्ल्या  भाजप नेत्यांना भेटला होता – राहुल गांधी

247

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – देशातील बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्याने देश सोडण्यापूर्वी भाजप नेत्यांची भेट घेतली होती, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केला आहे.

लंडन येथे भारतीय पत्रकारांसमोर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, देश सोडण्यापूर्वी मल्ल्याने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची दस्तऐवजात नोंद आहे. विजय मल्ल्याप्रती केंद्र सरकार नरमाईचे धोरण अवलंबत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. परंतु, राहुल यांनी या नेत्यांची नावे सांगण्यास नकार दिला आहे.

विजय मल्ल्या २०१६ मध्ये देश सोडून गेल्यापासून इंग्लंडमध्ये राहत आहे. भारत सरकारने इंग्लंडला त्याचे प्रत्यार्पण करण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी सीबीआयने लंडन न्यायालयात मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहातील ८ मिनिटांचा व्हिडिओ सादर केला आहे. इंग्लंडने मल्ल्याला भारताच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला ठेवण्यात येणाऱ्या तुरूंगाचे चित्रीकरण त्या व्हिडिओत आहे.

मल्ल्यासारख्या फरार व्यक्तीला कारागृहात  सुविधा देणे योग्य नाही.  भारतीय कारागृह मल्ल्यासारख्यांसाठी ठीक आहेत. सर्व भारतीयांना न्याय समान हवा. मल्ल्याने बँकांना ९००० कोटी रूपयांना फसवले म्हणून त्याला वेगळ्या कारागृहात ठेवणे योग्य नाही, असे राहुल गांधी  म्हणाले.