देशाला खडड्यातून काढण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना रनौट

194

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – भाजपच्या ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानाला बॉलिवूड क्वीन, प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौटने उघडपणे पाठिंबा दिला आहे. ‘देशाला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी पाच वर्ष पुरेसे नाहीत. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. तेच पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत,’ असे मत कंगनाने व्यक्त केले आहे. मात्र राजकारणात प्रवेश करण्याबाबतच्या प्रश्नावर तिने सूचक मौन पाळले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर आधारीत ‘चलो जीते है’ या शॉर्ट फिल्मच्या प्रीमियर प्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कंगना रनौटने हे वक्तव्य केले. यावेळी तिने मोदींची प्रचंड स्तुती केली. ‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही मोदींचा विजय झाला पाहिजे. कारण देशाला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी पाच वर्ष खुप कमी आहेत,’ असे ती म्हणाली.

‘या शॉर्ट फिल्ममधून मोदींचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. आई-वडिलांमुळे मोदी आज सर्वोच्च पदाला पोहोचलेले नाहीत. तर स्वत:च्या मेहनतीच्या बळावर त्यांनी यशाचं शिखर गाठले आहे,’ असेही ती म्हणाली. कंगनाने पहिल्यांदाच देशाच्या राजकारणावर तिची मत उघडपणे मांडली. या प्रीमियरला अभिनेता अक्षयकुमार, गुलशन ग्रोव्हर, अमिषा पटेल आणि संजय खान यांच्यासहीत बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. याश्वाय रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानीही उपस्थित होते.