देशात स्वतंत्र न्यायव्यवस्थेशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही- चेलमेश्वर

88

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – देशात स्वतंत्र न्यायव्यवस्थेशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही असे मत जस्टिस जे चेलमेश्वर यांनी मांडले. सुप्रीम कोर्टाचे जस्टिस जे चेलमेश्वर हे शुक्रवारी निवृत्त झाले, त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. १२ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काही न्यायाधीशांनी बंडाचे निशाण फडकावले होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर ज्या चार न्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित केले त्यापैकी एक म्हणजे जे. चेलमेश्वर होते.

न्यायाधीश रंजन गोगोई, एम. बी. लोकूर, कुरियन जोसेफ आणि जे. चेलमेश्वर यांनी पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीश दीपक मिश्रांवर टीका केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच चार न्यायाधीशांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेची धुरा जस्टिस जे चेलमेश्वर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज व्यवस्थित चालत नाही. खटला चालवण्यासाठीचे कामकाजाचे वाटप चांगल्या पद्धतीने होत नाही. कनिष्ठ न्यायाधीशांकडे महत्त्वाचे आणि संवेदनशील खटल्यांचे काम दिले जाते. पसंतीच्या खंडपीठांकडे महत्त्वाचे खटले सोपवले जातात असे आक्षेप या पत्रकार परिषदेत घेण्यात आले होते.

आता न्यायाधीश जे चेलमेश्वर हे निवृत्त झाले आहेत. अशातच त्यांनी देशात स्वतंत्र न्यायव्यवस्था हवी अन्यथा लोकशाही जिवंत राहणार नाही असे मत मांडले आहे. तसेच १२ जानेवारीला जी पत्रकार परिषद घेण्यात आली त्याचेही त्यांनी समर्थनच केले आहे. त्या पत्रकार परिषदेवर टीका झाली मात्र मला वाटत नाही की त्यात काहीही गैर होते. आमची घुसमट आम्ही मांडली होती, मला जर त्यात काही गैर वाटले असते तर मी पत्रकार परिषदेत सहभागच घेतला नसता. जे काही घडत होते ते मांडणारा मी एकटा नव्हतो माझ्यासोबत आणखी तिघेजण होते ज्यांचे मत माझ्यासारखेच होते असेही चेलमेश्वर यांनी म्हटले आहे.