देशात लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र घ्या; अमित शहांचे लॉ कमिशनला पत्र

76

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यास निवडणुकीवरील खर्चात बचत होईल. तसेच देशाचे  संघीय स्वरुप आणखी मजबूत होण्यास मदत होईल, अशा आशयाचे पत्र भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी लॉ कमिशनला पाठवले आहे. दरम्यान याबाबत लॉ कमिशन सध्या विचार करत आहे. आपल्या अहवालाला अंतिम रुप देण्यापूर्वी राजकीय पक्षांची मतही जाणून घेतली जाणार आहेत.

देशात एकत्र निवडणुका घेणे, हे देशाच्या संघीय स्वरुपाविरोधात आहे, असा करण्यात येत असलेला आरोप निराधार आहे. उलट यामुळे संघीय स्वरुप आणखी बळकट होईल. एकत्रित निवडणुकांना राजकीय  हेतूने विरोध होत आहे, असे लॉ कमिशनला लिहिलेल्या आठ पानी पत्रामध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक देश, एक निवडणूक याचे समर्थन केलेले आहे.

दरम्यान, या मुद्द्यावर भाजपच्या शिष्टमंडळाने लॉ कमिशनची भेट घेतली होती. शिष्टमंडळामध्ये केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, भूपेंद्र यादव आणि अनिल बलूनी यांचा सहभाग होता. भाजप लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या बाजूने आहे. सततच्या निवडणूक प्रक्रियेचा विकासकामांवर परिणाम होतो. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्यात आवश्यक संशोधन करावे. २०१४ पर्यंत सर्वांच्या सहमतीने हे संशोधन पारीत करण्यात यावे, असे या शिष्टमंडळाने म्हटले आहे.