देशात जगण्यासाठी सर्वाधिक चांगल्या शहरांच्या यादीत पुणे अव्वलस्थानी !

1566

पुणे, दि. १३ (पीसीबी) – देशात जगण्यासाठी सर्वांधिक चांगल्या शहरांच्या यादीत  पुणे शहराने अव्वलस्थान पटकावले आहे. अव्वल १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश असून  या यादीत नवी मुंबई,  मुंबई या शहरांनीही दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. तर ठाणे शहर सहाव्या स्थानी आहे.  तर  देशाची राजधानी दिल्लीची ६५ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. याबाबतची यादी केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने आज (सोमवार)  प्रसिद्ध केली. 

हे सर्वेक्षण देशातील १११ शहरांमध्ये करण्यात आले. शहरांची निवड करताना संस्था, प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा यात शिक्षण आणि आरोग्य त्याचबरोबर आर्थिक घटक आणि पायाभूत सुविधा या घटकांचा विचार करण्यात आला, असे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सुरी यांनी सांगितले. या यादीत चेन्नईला १४ वा क्रमांक मिळाला आहे. कोलकाताने सर्वेक्षणात भाग घेण्यास नकार दिला होता, असे सुरी यांनी सांगितले.

टॉप १० शहरांमध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या राजधानी शहरानी स्थान मिळवले आहे. उत्तर प्रदेशमधील रामपूर शहराला या यादीत खालचा क्रमांक मिळाला आहे. टॉप १० शहरांच्या यादीत चौथ्या स्थानी तिरूपती, पाचव्या क्रमांकावर चंदीगड, सातव्या स्थानी रायपूर,  इंदूर आठव्या स्थानी विजयवाडा, नवव्या तर भोपाळ दहाव्या स्थानी आहे.

या सर्वेक्षणात सर्व १०० स्मार्ट शहर आणि ज्या शहरांची लोकसंख्या १० लाखांहून अधिक आहे, अशा शहरांचा समावेश करण्यात आला होता. हावडा,  न्यू टाऊन कोलकाता आणि दुर्गापूरने या शहरांनी सर्व्हेत भाग घेण्यास नकार दिला होता. नवीन रायपूर आणि अमरावती हे सर्वेक्षणाच्या निकषात बसले नाहीत.